|| गण गण गणांत बोते ||
शेगावीचा राणा अवतरला सांगवी गावात
पूर्व पिठीका :
पुण्यातील सुशिक्षित भाविक मंडळी, धनिक मंडळी एक शतकाहून अधिक काळापासून अवलिया संत श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या शक्ती सामर्थ्याची कल्पना होती. नागपूर निवासी श्रीमंत बुटी यांच्या सिताबर्डी येथील प्रशस्त वाड्यात बराच काळ महाराजांना आदराने वास्तव्यास ठेवण्यात आले होते. प्रचंड श्रीमंती असलेला कुबेर पुत्र बुटीचे आप्तगण, मित्र मंडळी पुणे शहरात होते. सहजच पुणे शहरात महाराजांच्या नावाचा पुण्यात प्रचार होऊ लागला होता. पुणे ते शेगाव प्रवास त्यावेळी अवघड होता. त्यामुळे पुणे परिसरातील सामान्य जनास महाराजांचे दर्शन घडणे कठीण होते. महाराजांच्या समाधी कालानंतर ही अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना दर्शनाचा योग घडणे कठीण होते.
सुमारे साठ वर्षापूर्वीची गोष्ट : शेगावीच्या गजानन महाराजांच्या शक्ती सामर्थ्याची वार्ता सांगवी गावातील एका धनिक शेतकऱ्याच्या कानी आली. अनेक ठिकाणी भरपूर शेती असलेल्या मात्र साध्या रहाणीच्या ह्या श्रीमंत शेतकऱ्याने महाराजांचे दर्शन घेण्याचे ठरवले. अनेक वर्षे पंढरपूरच्या आषाढी-कार्तिकी पायी वाऱ्या करणाऱ्या पांडुरंग भक्तास महाराजांच्या (समाधी) दर्शनाची ओढ लागली होती. पुणे परिसरातील सांगवी (हवेली) गावापासून शेगाव प्रवास करायचा होता. प्रवास त्या काळात टप्प्या टप्प्याने करावा लागत होता. शेगांवी पोहोचल्यावर समाधीचे दर्शन घेताच या गृहस्थास जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले. अवलिया संत श्री गजानन महाराज हे त्यांचे दैवत झाले.
त्या काळातील सांगवी गावातील एकूलता एक श्री गजानन महाराज भक्ताचे नाव होते ‘कै. आनंदराव पांडुजी ढोरे (पाटील)’. पंढरीचे वारकरी यास महाराजांचे भक्ती चा लागलेला लळा त्यांच्या कुटुंबावर प्रभाव करीत राहिला. यांनी मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये व्यापार सुरू केला. व्यापाराची भरभराट होऊ लागली. श्रीमंतीत वाढ होऊ लागली, परंतु या कुटुंबाने महाराजांचे भक्तीचा ‘वसा’ सोडला नाही; पुढे त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री नारायणराव आनंदराव ढोरे यांनी चालविला.
महाराजांची आळंदी पालखी वारी :
माऊलींच्या दर्शनार्थ आळंदी यात्रे प्रीत्यर्थ महाराजांची आळंदी पालखी वारी करण्याचे ठरविण्यात आले. तब्बल चाळीस वर्षांपूर्वी शेगाव देवस्थानाच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला होता. आळंदी पायी वारी ची जय्यत तयारी शेगाव संस्थानाने केली. मार्ग ठरला, मुक्काम ठरले, नियम ठरले, पुण्यात मुक्काम देखील ठरला. पुण्यातील मान्यवर भक्तांना आनंद झाला. तथापि अवलिया संतांच्या भक्तगणांची व महाराजांच्या दिव्यशक्ती ची किमया माहित असलेल्या कुटुंबांची संख्या त्या वेळी येथे फार सीमित होती. पहिल्या पालखी वारीस शेगाव संस्थान च्या कारभाऱ्यांना फार कष्ट उचलावे लागले. अवलिया संत, वल्ली यांना न मानणाऱ्या काही धर्ममार्तंडांच्या त्यावेळी विरोध सहन करावा लागला असेल.
पुण्यातील पालखी मुक्कामाची व्यवस्था अखेर विश्वस्तांनी व पुण्यातल्या भक्तांनी केले. पुण्यातील पालखी वारीचे पुण्यातून प्रस्थान होताना सकाळी पहिला मुक्काम (भेट) शिवाजीनगर भागातील ज्ञानेश्वर पादुका चौकात जवळील श्री बाळासाहेब उर्फ नारायणराव आनंदराव ढोरे यांचे निवासस्थानी झाला. पुढे दोन तपे श्री ढोरे कुटुंबांना ही सेवा लाभत राहिली. हेच पालखी पुढील प्रस्थापना करिता औंध मार्गे जाताना सांगवी गावातून जावी व दुपारी तिचा मुक्काम असावा असा आग्रह श्री बाळासाहेब उर्फ नारायण ढोरे यांनी शेगाव संस्थांच्या विश्वस्तांना केला. विश्वस्तांनी मान्यता दिली व पालखी दोन-चार तासा करिता सांगवी गावात येणे सुरू झाले. श्री बाळासाहेब कुटुंबांची भक्ती फळा आली. सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलीच्या पांडुरंगाच्या भक्ताची कै. आनंदराव पांडुजी ढोरे यांचे पुण्याई फळाला आली. त्यांच्या वाड्यात पालखी काही तासा करिता थांबू लागली. सांगवी गावातील जनतेला दर्शनाचा लाभ मिळू लागला. पालखी वारकऱ्यांचे भोजन, दर्शनार्थ्यांना (साधा) प्रसाद वगैरे कामे स्वयंसेवक का मार्फत होऊ लागले.
इवलेसे रोप लाविले या दारी :
महाराजांच्या पालखीचे सेवेची सांगवी स्थितीत ही प्रथा पुढे अनेक वर्षे राबवायची होती. त्याकरिता स्थायी स्वरूपाची व्यवस्था होणे आवश्यक होती. व्यापारानिमित्त बहुदा मुंबईत वास्तव्यास असणारे श्री बाळासाहेब ढोरे याबाबत चिंतित होते. विदर्भ जळगाव भागातील बहुसंख्य महाराजांचे भक्त सांगवी गावात होते. मनापासून भक्तिभावाने व्यवस्था करणारा गट तयार करण्यास भक्तगणातील व्यक्ती बाळासाहेब व दादा हांडे शोधत होते. त्यांना त्यात एक व्यक्ती दिसली. आनंदाने दरवर्षी सेवा देणारी एक व्यक्ती अगदी दोन दिवस सुट्टी घेऊन राबत होती. इतरांचा विशेष परिचय नसल्यामुळे न बोलता सेवा करीत होती. ‘ही व्यक्ती योग्य असावी’ असा अंदाज बाळासाहेबांनी बांधला. त्यांच्या सूक्ष्म दृष्टीतून त्या जनसागरातही ही व्यक्ती सुटली नाही. त्या व्यक्तीस त्यांनी बोलावले. त्यांना विचारणा केली.
आपले नाव काय? कुठून आलात? ‘माझे नाव रमेश गणपतराव बावस्कर आहे. मी शेगावचा आहे. माजी सैनिक आहे.’ बावस्कर यांनी उत्तर दिले.
बाळासाहेब मनोमन म्हणाले, ‘अरेच्या, महाराजांनी आधीच आपला एक भक्त पाठवला आहे. बाळासाहेब त्यांना म्हणाले, ‘यापुढे पुढील वर्षापासून तुम्ही सारी व्यवस्था करायची. स्वयंसेवक जमवायचे, सर्व भक्तगण जमवा आम्ही मदतीस आहोतच.’
‘मी प्रथम आमच्या मित्रमंडळींना विचारतो व तुम्हास सांगतो.’ बावस्कर म्हणाले. बावस्करांनी मित्रमंडळी जमविली. प्रस्ताव मांडला. मित्रांनी काही बाबी स्पष्ट केल्या.
मित्र म्हणाले, ‘श्री गजानन महाराजांचा स्वभाव आपणास माहीत आहे. मनापासून कार्य केले तर ते आयुष्यात न संपणार सहज सर्व देतात. परंतु चुकले तर त्यांचा फटकाही भारी असतो. ते अवलिया संत आहेत. म्हणून हे कार्य करायचे असेल तर यात कुणाचा चुकीचा हस्तक्षेप नको. लोक वर्गणीत घोटाळे करणारे स्वयंसेवक नको. पै पै चा हिशोब द्यावा लागेल. सर्व हिशोब जाहीर करावा लागेल.’
याच संदेशाची श्री बाळासाहेब ढोरे – श्री शिवहरी हांडे वाट बघत होते. त्यांनाही महाराजांच्या स्वभावाची कल्पना होती. भक्तगण एकत्र आले. खर्चाचे अंदाजपत्रक तयार झाले. वर्गणी गोळा करण्यास गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटास वर्गणी करिता क्षेत्र ठरले. सांगवी – नवीसांगवी बाहेर देखील वर्गणी घेणे सुरू झाले. दरवर्षी पालखी सोहळा फार उत्साहात पार पडू लागला. देणग्या गोळा होऊ लागल्या. देणगीतील रक्कम (दरवर्षी) शिल्लक राहू लागले. सांगवी गावातील काही तासाचा मुक्काम अत्यंत उत्साहात संपन्न होत होता. भाविकांची प्रचंड गर्दी होत होती. पालखीला स्पर्श करीत महाराजांचा आशीर्वाद घेण्याची चढाओढ होऊ लागली. येथील भक्तांचा उत्साह, स्वयंसेवकांनी केलेली व्यवस्था, अहिल्याबाई होळकर शाळेत काही घटकांची होणारी उत्तम व्यवस्था व सेवा पाहून शेगाव संस्थानचे कारभारी पालखी प्रमुख अगदी संतुष्ट झाले व त्यांनी एक दिवस पूर्ण मुक्कामाची संधी सांगवी गावात दिली. भक्तांचा, कार्यकर्त्यांचा, स्वयंसेवकांचा आनंद गगनात मावेना. सर्व या सेवेची वाट बघत होते.
वर्गणी, देणगीरूपा धान्य सहज गोळा होऊ लागले. वारकऱ्यांच्या निवासाची चोख व्यवस्था होऊ लागले. साधारणत: सहाशे वारकरी पालखी सोबत असायचे. सांगवीच्या भव्य शाळेत अगदी घरासारखी त्यांची व्यवस्था होऊ लागले. पहाटे-पहाटे त्यांना स्नाना करिता गरम पाण्याची सेवा देऊ लागले. आदल्या दिवशीचे जेवण, नाश्ता, चहा सर्व काळजीपूर्वक श्रद्धापूर्वक समर्पित होऊ लागले. ‘आमचा खरा थकवा सांगवीत निघतो’ असा शेरा वारकऱ्यांच्या तर्फे मिळू लागला.
महाराजांच्या देवळाचा शुभारंभ :
महाराजांचे सांगवी गावात देऊळ असावे अशी कल्पना पुढे आली. श्री बाळासाहेबांची ती आंतरिक इच्छा होती. शाळेच्या मैदानात समोरील अगदी मोठ्या रस्त्यास लागून त्यांचा पाच गुंठ्याचा प्लॉट होता. तो मंदिरा करिताच त्यांनी ठेवला होता. आता बाळासाहेबांनी सर्वांसमोर उघड केले.
आजुबाजूस असलेले प्लॉट मालक भक्तगणांत पैकीच होते. कोणाचाही विरोध नव्हता. दादा हांडे यांना याची कल्पना होती. एके दिवशी बाळासाहेब सर्व कार्यकर्त्यांना घेऊन प्लॉटवर आले. चतु:सीमा दर्शविली.
एका चांगल्या मुहूर्तावर श्री दादा हांडे व हांडे वहिनी यांनी दोन चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ब्राह्मणा हस्ते विधीपूर्वक जागेवर भूमिपूजन देखील केले. त्या दिवशी श्री बाळासाहेब आनंदराव ढोरे यांनी तो ५ गुंठयाचा प्लॉट त्यांच्या आई व वडिलांच्या स्मरणार्थ श्री गजानन महाराजांच्या मंदिरासाठी दान दिला.
या जागेवर मूळ रस्त्यापासून दहा अकरा फूट अंतर सोडून लहानसे मंदिर बांधण्यात आले. त्यात महाराजांचा फोटो व घडीव पादुका ठेवण्यात आल्या. मंदिरासमोरच सुमारे पंचवीस X चाळीस फुटाचा ओटा बांधण्यात आला व त्यावर उत्तम शेड उभारण्यात आली. नित्यनियमाने पूजाअर्चा सुरू झाली. छोट्या छोट्या देणग्यांचा ओघ सुरू झाला. प्लॉटला कंपाउंड घालण्यात आले. लोखंडी गेट बसवण्यात आले. मंदिराचे मागील बाजूस बोळ आहे. शेजारच्या लोकांचा तेथे वावर असतो. या बोळीस लागून ढोरे कुटुंबाचाच रिकामा प्लॉट आहे (होता). यातील मंदिराजवळील काही भागावर मंदिराचे कार्यालय, भंडारा गृह, संडास बाथरूम बांधले गेले. कॉर्पोरेशन द्वारे पाणी (नळ) मिळाले. या छोटेखानी मंदिरासमोरील ओठयावरच श्री गजानन महाराजांची पालखी दरवर्षी (मुक्कामी) ठेवण्यात येत होती. महाराजांच्या पालखी च्या विश्रांतीने ही जागा पुनीत झाली.
याच जागेत मोठे भव्य मंदीर बांधले जावे अशी सर्वांची इच्छा होती. तत्पूर्वी संस्था-ट्रस्ट रजिस्टर होणे आवश्यक होते. ट्रस्ट रजिस्ट्रेशन झाले. धार्मिकते सोबतच बहुउद्देशीय ट्रस्ट स्थापन झाली. ट्रस्ट चे नाव ठरले
– ‘श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास’
शुभ लक्षणे :
सदर भव्य मंदिराची निर्मिती होण्यापूर्वी काही शुभ लक्षणे आढळली. ही शुभ लक्षणे म्हणजे एक प्रकारे या संपूर्ण कार्यास महाराजांनी स्वतः दिलेली संमती होती.
- श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास या नावाने ट्रस्ट करायचे ठरले. त्याकरिता मार्गदर्शक शोधत होतो. योगायोगाने अॅड. श्रीरंग होनप साहेब आम्हास मिळाले. ते तर गजानन महाराजांचे भक्त होते. त्यांनी आम्हास संपूर्ण नि:शुल्क सहकार्य केले. दरम्यान नवीन आलेला धर्मदाय आयुक्तांनी व त्यांच्या स्टाफ ने अगदी जलद गतीने आमच्या ट्रस्टला मान्यता दिली. हा एक चमत्कारच होता
- श्री किर्दत साहेब हे सुप्रसिद्ध आर्किटेक्चर योगायोगाने आम्हास मिळाले. त्यांनी संपूर्ण नि:शुल्क सेवा केली. आज ही ते मार्गदर्शन करतात. त्यांचे हातून एक उत्तम मंदिराची उभारणी होईल असा त्यांना दृष्टांत होता असे कळले. यातील पहिले मंदिर हेच आहे. हा देखील एक चमत्कारच होता.
- महाराजांची सुंदर मूर्ती ऑर्डर देऊन तयार करून राजस्थानातून आणण्यात आली. मूर्तीची पश्चिम दिशाभिमुख प्रतिष्ठापना झाली. गाभाऱ्यातील ही भव्य मूर्ती उंचावर असल्यामुळे अगदी मंदिराबाहेरुन ती दिसू शकते, दर्शन घडते.
- मंदिर निर्मितीस नऊ वर्षे लागली. ट्रस्टच्या कार्यकारी पदाधिकाऱ्यांचा दर तीन वर्षांनी होणारा बदल नऊ वर्षे टाळण्यात आला. अनेकदा पदाधिकाऱ्यांना बदल ‘होणाऱ्या कार्यात’ अडचणीचा ठरतो हे सर्वांनी लक्षात घेतले. मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा करण्यात आल्या. अनेकांचे सहकार्य लाभले.
- अशाप्रकारे अनेक सुलक्षणे घडत गेली इ. स. २००५ मध्ये महाराजांच्या प्रकटदिनाला प्रतिष्ठापना व कळस पूजन संपन्न झाले. कलशारोहन आदरणीय पूज्य श्री शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांचे हस्ते झाले. नऊ दिवस हा स्थापन सोहळा विधिवत सुरू होता. प्रतिष्ठापना सोहळा समारंभ काळातच ह. भ . प .श्री रामराव ढोक महाराज यांचे श्री रामायणाचा प्रवचनाचा(सप्ताहाकरिता ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अनेक भाविक भक्तांची उपस्तिती होती यास जनतेने उत्स्फूर्त साथ दिली.
- श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनाचा मुहूर्त साधत (इ. स .४ मार्च २००५) मंदिराच्या या भव्य वास्तूमध्ये महाराजांचे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मूर्ती प्रतिष्ठापने पूर्वी विधीवत मूर्तीस सात दिवस वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रोक्त -सूचनांचे पालन करीत -अभिषेक करण्यात आले हा विधी करताना ”प्राणांनां प्रतिष्ठा भवती “अन्वयार्थ प्राण प्रतिष्ठे प्रित्यर्थ ” वेद पठण, मंत्रोपचारादी धार्मिक विधी करण्यास पंडित श्री दिवाकर गोरे (गुरुजी ) आणि इतर पंडितांना पाचारण करण्यात आले होते.
प्रगटदिनी अनेक भक्त भाविकांना महाआरतीनंतर महाप्रसादाचा लाभ झाला. - प्रगटदिनाचे दुसरे दिवशी काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या कीर्तनानंतर शेकडो भक्त भाविकांना महाप्रसादाचा लाभ प्राप्त झाला.
सायंकाळी महाराजांच्या पालखीची ग्रामदिंडी (शोभायात्रा) काढण्यात आली. यात महामिरवणुकीत वेगवेगळे भजनी मंडळ, वाद्यवृंद, तुळस डोक्यावरी असलेल्या महिला व असंख्य भक्तगण सामील होते.
हीच ग्रामदिंडीची (शोभायात्रेची) प्रथा अद्यापही सुरु आहे. या ग्रामप्रदक्षिणेनंतर महाआरती होते व प्रगटदिन सप्ताहाची (हरिनाम सप्ताहाची ) सांगता होते. - दर गुरुवारचा कार्यक्रम – श्रींच्या महापूजेचा विशेष कार्यक्रम दर गुरुवारी असतो दर गुरुवारी -पहाटे अभिषेक असतो .यात पंडितांचे हस्ते अभिषेक होत असतो नोंदणी केलेल्या भक्तांना अभिषेकाचा लाभ प्राप्त होतो.
सायंकाळी ७ -३० वाजता महाआरती असते. यात शेकडो भाविक भक्तांची उपस्तीथी असते या दिवशी महाप्रसादाकरिता नोंदणी केलेल्या भक्तां पैकी पहिल्या सात भक्तांना आरती पात्रे दिल्या जातात.
महाप्रसादाकरिता सद्या रु ७५०/- देणगी स्विविकारली जाते. यात मोठी प्रतिक्षा यादी असते.
आरतीनंतर समस्त उपस्थितां ना पिठलं भाताचा प्रसाद वाटप होतो. रात्री महाराजांची शेजाआरती करून ९-३० नंतर विश्राती घेतली जाते.